पुणे - शिक्षक मतदारसंघात शिक्षक कृती समितीचे पंढरपूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांचे विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांनी निवडणूक लढवली. आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकजुटीने केलेले प्रयत्न, पक्षाशी संबंधित शिक्षण संस्थांमधील शिक्षकांचा पाठिंबा, या जोरावर काँग्रेसने ही जागा पटकावली आहे.
भाजप पुरस्कृत राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार जितेंद्र पवार यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुणे शिक्षक मतदारसंघात एकूण 72 हजार 545 मतदार होते आणि एका जागेकरिता 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पाच जिल्ह्यांचा विचार करता सर्वाधिक 32 हजार 201 मतदान हे पुणे जिल्ह्यातील असल्याने ते निर्णायक ठरणार होते. याशिवाय कोल्हापूर मधील 12 हजार 237 आणि सोलापूर जिल्ह्यातील 13 हजार 584 मते कोणाच्या पारड्यात पडतात यावर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून होते.
30 व्या फेरी अखेरही अपेक्षित कोटा अपूर्णच
शिक्षक मतदारसंघात यंदा सुमारे 55 हजार मतदान झाले आणि 24 हजार मतांचा विजयी कोटा ठरविण्यात आला. मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार आसगावकर यांना पहिल्या फेरीत अपेक्षित मते मिळू न शकल्याने मोजणीच्या 30 फेऱ्या करण्यात आल्या. परंतु, इलिमिनेशनच्या 30 व्या फेरी अखेर ही त्यांना अपेक्षित कोटा पूर्ण करता येऊ शकला नाही. अखेर आसगावकर यांना सर्वाधिक 19 हजार 426 मते मिळाली. शिक्षक कृती समितीचे अपक्ष उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना 12 हजार 603 मते मिळाली तर भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांना ६ हजार 607 मते मिळू शकली. लोकभारतीचे उमेदवार गोरखनाथ थोरात यांना पाच हजार 180 मते मिळाली असून ते चौथ्या स्थानावर राहिले आहेत.