पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे आता एकाच मंचावर 1 ऑगस्टला येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रदेश पातळीवर रोहीत टिळक यांच्याशी चर्चा करून हा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्रात लिहिले आहे की, पुणे शहरामध्ये दरवर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार : लोकमान्य टिळकांचा इतिहास स्वातंत्र्य काळाच्या अगोदरपासून हा काँग्रेसच्या विचारसरणीशी जोडलेला आहे. असे असताना आपल्या प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी डॉ. रोहीत टिळक यांच्याकडून नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्याचे योजिले आहे. डॉ. रोहीत टिळकांनी शरद पवार यांना विनंती केली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देवून त्यांची पुरस्कारासाठी वेळ घ्यावी, असे वृत्तपत्रामधून जाहीर करण्यात आले आहे.
लोकशाही विरूध्द कृत्य : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त स्वर्गीय जयंतराव टिळक अनेक वर्षे काँग्रेसच्या काळामध्ये विधानपरिषदेचे सदस्य होते. तसेच डॉ. रोहीत टिळक हे एनएसयुआयचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर कसबा पेठ विधानसभेतून त्यांना दोन वेळा उमेदवारी दिली गेली होती. एकिकडे आपले नेते राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या लोकशाही विरोधी विचारांना विरोध करीत आहेत. देशात व परदेशामध्ये सुध्दा नरेंद्र मोदी हे लोकशाही विरूध्द कृत्य करत आहे, असे असताना आपल्या काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी त्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांशी विसंगती असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार जाहीर करणे व बोलवणे अत्यंत खेदजनक वाटत आहे. त्याचा रोष संपूर्ण पुणे शहरातील काँग्रेस कार्यकत्यांमध्ये आहे. म्हणून आपल्या स्तरावर आपण डॉ. रोहीत टिळक यांना समज द्यावी.
कार्यक्रम रद्द करावा : कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला द्यावा. जे आपणास योग्य वाटेल तसा आदेश त्यांना द्यावा, परंतु असा कार्यक्रम काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी घेणे अत्यंत अयोग्य वाटत आहे. तरी आपल्या स्तरावर उचित कार्यवाही व्हावी ही विनंती, असे पत्र नाना पटोले यांना अरविंद शिंदे यांनी लिहिले आहे. आता तर आम्ही पुरस्काराबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष यांना पत्र लिहिले आहे. जर कार्यक्रम झाला तर आम्ही शेवटच्या क्षणी जी भूमिका घ्यायची आहे ती घेणार असल्याचा इशाराही अरविंद शिंदे यांनी दिला आहे.
हेही वाचा :
- Modi And Pawar On Same Platform : नरेंद्र मोदी, शरद पवार 'या' कारणामुळे एकाच मंचावर येणार; कॉंग्रेसचा विरोध?
- Sharad Pawar : मोदींच्या टीकेनंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले..
- NCP Reply PM Modi Allegation : नरेंद्र मोदींच्या आरोपांना राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर; म्हणाले, मोदींना जुने दिवस आठवायला...