पुणे - राजकारण करण्यावेळी राजकारण करू आता राजकारण करू नये. फडणवीसांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहू नये, असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना लावला आहे. सोनू सूदने चांगले काम केले आहे. त्यामुळे सोनू सूद असो की इतर कोणी संकटकाळात काम करणाऱ्यांचे अभिनंदनचं आहे. संजय राऊत सोनू सूदबद्दल काय बोलले ते माहीत नाही. मात्र, जो कोणी चांगले काम करेल त्यांच्या माझ्यावतीने अभिनंदनच आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुख आज पुणे शहरात होते. शहराची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुणे भेटी दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या भागांना भेटी देत कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. राज्यातील ६० जेलमध्ये ३८ हजार कैदी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही संख्या कमी करण्यात आली. ९ हजार ६७१ कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. आणखी ११ हजार कैद्यांना सोडण्याचा विचार आहे. २४ जिल्ह्यांत ३१ नवीन जेल तयार केले आहेत, अशी माहिती देशमुखांनी दिली.
राज्यात ३ हजार पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील काहींना आपण वाचवू न शकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घेतली आहे. ज्या कर्मचाऱयांचे वय ५० ते ५५ वर्ष आहे त्यांना साधी ड्युटी देण्यात आली आहे तर ५५ वर्षांच्यावरील कर्मचाऱ्यांना घरीच राहण्यास सांगितले आहे, असेही देशमुख म्हणाले.