पुणे : राज्यात आत्ता कारखाने तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. आज पुणे जिल्ह्यातील नऊ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी मतदान आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान आज पुण्यातील शिवाजी मराठा सोसायटी येथे सकाळपासून सुरू झाले आहे. सकाळच्या पहिल्याच सत्रामध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळाला आहे. बोगस मतदान झाल्याचा आरोप करत उमेदवारांकडून मतदान थांबविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
बोगस मतदान झाल्याचा आरोप : आज सकाळी 8 वाजता हवेली तालुक्यातील मतदारांचा मतदान शिवाजी मराठा सोसायटी येथे होत आहे. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही 20 वर्षानंतर होत आहे. या निवडणुकीत तब्बल 13 हजार 174 मतदार आहेत. मोठ्या प्रमाणात आज सकाळपासून मतदार बाहेर पडले असून मतदान करत आहे, पण असे असताना उमेदवारांकडून बोगस मतदान झाल्याचा आरोप काही उमेदवारांनी करून मतदान प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे.
योग्य नियोजन नाही : याबाबत काही उमेदवारांनी सांगितले की, सकाळपासून कोणत्याही पद्धतीने पोलीस प्रशासन तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून नियोजन करण्यात आलेले नाही. मतदारांचे स्लीप तसेच मतदान कार्ड याची तपासणी देखील केली जात नाही. बोगस मतदारांना सोडून त्यांची मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे. एका आजीचे मतदान झालेले नसतानाही त्या मतदानासाठी गेल्या असता त्यांचे मतदान झाल्याचे सांगितले गेले आहे.
पोलिस बंदोबस्त तैनात करून मतदान : त्यानंतर मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. पोलीस प्रशासन आणि उमेदवार यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. काही वेळ चाललेल्या गोंधळीनंतर पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून मतदान प्रक्रियेला सुरू करण्यात आले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक वीस वर्षानंतर होत आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. सर्व प्रक्रिया ही व्यवस्थितरीत्या चालू आहे. प्रशासनाकडून उमेदवारांना योग्य त्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. तसेच कोणत्याही पद्धतीने बोगस मतदान झालेले नसल्याची माहिती यावेळी निवडणूक अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली. सकाळच्या पहिल्या तासाच्या सत्रात 10 टक्के मतदान झाले आहे. आता मतदान हे व्यवस्थित सुरू आहे.