बारामती - सध्या देशपातळीवर शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षामागचे एक प्रमुख कारण म्हणजे पंजाब, हरियाणा येथे पिकणाऱ्या गहू व तांदूळ या पिका संदर्भातील किंमती आहेत. तसेच योग्य बाजारपेठ मिळत नसल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले. शारदानगर कृषीविज्ञान केंद्रात राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्थान,अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि बायर कंपनी या तिघांच्या संयुक्त प्रयत्नातून 'कृषिक 2021' कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी शरद पवार बोलत होते.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री शंकरराव गडाख, दत्तात्रय भरणे, विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, उपमहासंचालक सुरेश चौधरी, राज्याचे कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्यासह कृषी संशोधक, अभ्यासक व शेतकरी बांधव उपस्थित होते.
ग्राहकाला परवडेल आणि शेतकऱ्यालाही चार पैसे राहतील असा निर्णय व्हावा-
केंद्रीय कृषिमंत्री असताना पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांना संधी मिळेल. त्या-त्या वेळी नेहमी सांगायचो की, अधिक प्रमाणात गहू व तांदूळ पिक घेतल्याचे परिणाम मार्केटिंगवर जसे होतात. तसेच मातीच्या प्रतवारीवर देखील त्याचे दुष्परिणाम होतात. थोडं गव्हाचं क्षेत्र कमी करून डाळी व फळांचे पिके घेता येतील का?, असे वारंवार सुचवले. मात्र त्यावेळी फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे पवार यांनी सांगितले.
आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात तांदूळ व गव्हाचे पीक घेतले जाते. त्यामुळे विषमते सारख्या समस्या निर्माण होतात. एकत्रित विचारविनिमय करून ग्राहकाला परवडेल आणि शेतकऱ्यांना चार पैसे कसे मिळतील. यासाठी देशभरात त्या-त्या जिल्हा विभागात कोणत्या प्रकारची पिके घेता येतील, याचा विचार होणे गरजेचे असल्याचे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा- महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर जनतेकडून शिक्कामोर्तब; मंत्री गुलाबराव पाटील
हेही वाचा- रत्नागिरी: साखरतर खाडीत बोट पलटी होऊन तीन जणांचा मृत्यू