पुणे - जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक, कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ उर्फ शिवानंद (रा. भटकळ, जि. उत्तर कनडा, कर्नाटक) याला सोमवारी विशेष न्यायालयात हजर करून त्याच्यावर बॉम्बस्फोट प्रकरणाची आरोप निश्चिती करण्यात आली.
यासीन भटकळ सध्या तिहार कारागृहात आहे. सुरक्षेच्या कारणावरून सरकारी पक्षाने तिहार कारागृहातून त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्याची मागणी केली. त्याला यासीनचे वकील झहीर खान पठाण यांनी विरोध करत त्याला न्यायालयात हजर करूनच खटल्याची सुनावणी सुरू करावी, अशी मागणी केली. तसा अर्ज त्यांनी न्यायालयात सादर केला असून यावर १५ जून रोजी सुनावणी होणार आहे.
आरोप निश्चितीवेळी यासीन भटकळला त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी त्याने मी निर्दोष असल्याचे सांगितले. तसेच हैद्राबाद येथील प्रकरणातील काही गुन्हात निर्दोष सोडल्याचे त्याने सांगितले. भटकळला यापूर्वीच हैद्रराबाद येथील स्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२०१४ साली भटकळवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, हैद्राराबाद येथे खटल्याची सुनावणी सुरू असल्याने जर्मन बेकरी बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी सुरू झाली नव्हती. सध्या भटकळच्या कुठल्याच खटल्याची सुनावणी सुरू नसल्याने त्याला न्यायालयात हजर ठेवून सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी बचाव पक्षाचे वकिल झहीर खान पठाण यांनी केली.
१३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी कोरेगावपार्क येथील जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात १७ व्यक्ती मृत्युमुखी तर एकूण ५६ नागरिक गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये ५ व जखमींमध्ये १० परदेशी नागरिकांचा समावेश होता. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास एटीएसकडे सोपविण्यात आला होता.
दरम्यान, एटीएसने केलेल्या तपासात गुन्ह्यात वापरलेल्या स्फोटामध्ये आरडीएक्स या स्फोटकाचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले होते. जर्मन बेकरी या गुन्ह्याच्या ठिकाणी यासीन भटकळ यानेच बॉम्ब ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा केल्यापासून तो फरारी होता. गुप्तचर विभाग आणि 'रॉ' यांनी संयुक्तपणे कारवाई करताना यासिनला नेपाळच्या सीमेवरील सौनाली गावातून अटक करण्यात आली होती. त्याचा ताबा १३ मार्च २०१४ रोजी एटीएसकडे सोपविल्यानंतर त्याला याप्रकरणी १४ मार्च २०१४ रोजी पुणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दरम्यान त्याला प्रत्यक्षरित्या किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनेही न्यायालयात हजर करण्यात आले नाही. जर्मन बेकरी स्फोट प्रकरणी २२ ऑगस्ट २०१४ नंतर ८० हून अधिक न्यायालयीन सुनावण्यांना तो हजर राहिला नाही. या दरम्यान पाच वर्षांचा कालावधी उलटला आहे. पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, सुरत, वाराणसी या शहरांमध्ये झालेल्या बाँबस्फोटांमध्ये यासिन भटकळ आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग होता.
जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात मिर्झा हिमायत इनायत बेग उर्फ अहमद बेग इनायत मिर्झा उर्फ यूसूफ याचा सहभाग असल्याने त्याला 7 सप्टेंबर 2010 रोजी या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याला याप्रकरणी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु, उच्च न्यायालयात त्याची फाशीची शिक्षा पुराव्याअभावी कमी केली आहे.
यासीन भटकळ?
- बंदी असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक
- हैदराबादच्या दिलसुखनगरमधल्या दुहेरी बॉम्ब हल्ल्यात सहभागी
- 2010 : बंगलोरमधील चिन्नस्वामी स्टेडियम स्फोटात सहभाग
- दिल्ली उच्च न्यायालयात ७ सप्टेंबर २०११ ला झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग
- मुंबईत ७/१३ ला झालेल्या स्फोटातील महत्त्वाचा आरोपी
- पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला महत्त्वाचा आरोपी
- 2012 ला जंगली महाराज रोडवर झालेल्या स्फोटात सहभाग