पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झालं. शोषित वर्गाचा कैवार घेणाऱ्या या महापुरुषाच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी या दिवशी देशभरातील लाखो आंबेडकर अनुयायींचा महासागर चैतन्यभूमीवर उसळतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जागवणाऱ्या अनेक वास्तू आहेत. यातलीच एक वास्तू म्हणजे पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे असलेलं 'इंटरनॅशनल बुक सर्व्हिस'. या जागेशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक आठवण निगडित आहेत. या ठिकाणी आंबेडकर हे अनेक वेळा पुस्तक खरेदीसाठी येत असत. इथेच आंबेडकरांची भजी, सोडा आणि गप्पा अशी मैफल जमायची.
अनेक आठवणीना उजाळा : आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे पुस्तक महोत्सव, साहित्यिक गप्पा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, साहित्यिका श्यामाताई घोणसे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे हे उपस्थित होते. याच डेक्कन जिमखान्यावरील 'इंटरनॅशनल बुक सर्व्हिस' येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नियमितपणे पुस्तके खरेदीसाठी येत असत. यावेळी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.
भजी, सोडा आणि गप्पांची मैफील : यावेळी इंटरनॅशनल बुक सर्व्हिसच्या संचालिका सुप्रिया लिमये म्हणाल्या की,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि या वास्तूचं एक विशेष नातं आहे. जेव्हा जेव्हा आंबेडकर हे पुण्यात येत असत, तेव्हा तेव्हा या ठिकाणी येत होते. इथं येऊन ते विविध पुस्तके खरेदी करत असत. तसंच त्यांच्या वैचारिक बैठका देखील होत होत्या. यातून बऱ्याच जणांना नवनवीन गोष्टींचा अभ्यास देखील व्हायचा आणि ही आमच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे." विठ्ठलराव दीक्षित यांच्याकडून गप्पांच्या स्वरूपात मिळालेली एक आठवण म्हणजे जेव्हा बाबासाहेब इथे येत होते तेव्हा ते मागच्या दारातून येत. तेव्हा विठ्ठलराव दीक्षित त्यांना टेबलावर पुस्तके आणून देत असत. तेव्हा चहापानाबाबत विचारणा केली जात होती. पण बाबासाहेबांना भजी खूप आवडत असे. मग काय? भजी, सोडा आणि गप्पा अशी मैफल जमत असे. अशी आठवण यावेळी लिमये यांनी सांगितली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी देखील या वास्तूच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.