पुणे - जिल्ह्यात सततच्या पावसाने झालेल्या पूर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील पिके व फळबागांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बहुतांश शेती क्षेत्र बाधित झाले आहे. बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील बाधित शेती क्षेत्राची आज (शनिवार) जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आदी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
बारामती तालुक्यात ऑक्टोबरमध्ये सरासरी दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षे, बाजरी, चारापिके, कांदा, सोयाबीन आदी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - बांधावरील शेतकरी संकटात... राजकीय नेते मात्र राजकारणातच दंग
बारामती तालुक्यातील भोंडवे वाडी, पिंपळी, दंडवाडी, काटेवाडी, सुपा आदी भागातील बाधित शेती क्षेत्राची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधून पंचनामे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले.
हेही वाचा - पुणे-सोलापूर महामार्गावर चारचाकीची दुचाकीला धडक, तीन जण जागीच ठार
प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्रावर जाऊन पाहणी केली. पुढील तीन दिवसात कृषिसेवक, ग्रामसेवक, तलाठी यांनी संयुक्त पंचनामे करून पुढील आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, 15 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची कारवाई चालू होईल, अशी माहिती बारामती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी दिली.
बारामती तालुक्यातील 78 गावात सुमारे 3 हजार 600 शेतकऱ्यांच्या 1 हजार 821 हेक्टर पिकाखालील क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस 298 हेक्टर, भाजीपाला 120 हेक्टर, बाजरी 41 हेक्टर, चारा पिके 115 हेक्टर, मका 87 हेक्टर, सोयाबीन 280 हेक्टर, द्राक्षे 337 हेक्टर, कांदा 282 हेक्टर, ज्वारी 261 हेक्टर समावेश आहे.
हेही वाचा - मातीशी संबंध असणाऱ्यांनाच पावसाचा आनंद, खासदार श्रीनिवास पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला