पुणे - साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणाच्या भावना न दुखावणारा सुकर मार्ग काढतील, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पवार यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
पुढे बोलताना ते म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या (सोमवारी) यांसदर्भात बैठक बोलावलेली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी पाथरी आणि शिर्डी परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे. चर्चेतून मार्ग काढू, कोणाच्या भावना दुखवण्याचे कारण नाही. काही वेळा नवीन समस्यांना समोरे जावे लागते. गैरसमज निर्माण होणार नाहीत, असा मार्ग मुख्यमंत्री काढतील, असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर..'
यावेळी पवार वाडिया रुग्णालयाबद्दल म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आमच्या उपस्थितीत बैठक घेतली. राज्य सरकारने २४ कोटी सीएफ अॅडव्हान्स काढून तातडीने दिला आहे. महानगर पालिकेने २२ कोटी रुपये दिले आहेत. असे एकूण ४६ कोटी रुपये दिले आहेत. तर ७ दिवसात मुख्य सचिव, महानगर पालिका आणि राज्यसरकार, संबंधित विभाग वाडिया ग्रुप यांना एकत्र घेऊन पुढचा मार्ग चर्चेतून काढण्यात येईल.