पुणे - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र आता या भेटीने, मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचे समाधान झालेले नाही.
इतरही मुद्द्यांवर चर्चा -
मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानासोबतच्या बैठकीत ठोस काही समोर आलेले नाही, असे मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधानासोबतच्या बैठकीत केवळ मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर फोकस असायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या इतरही मुद्यांवर चर्चा केली. त्यामुळे केवळ मराठा आरक्षणासाठी म्हणून पंतप्रधानसोबत बैठक असे झाली नाही. तर इतरही विषय असल्याने मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला या चर्चेतून किती न्याय मिळेल, असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
केवळ पत्र देवून प्रश्न सुटणार नाही -
केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने आपआपली जबाबदारी निश्चित करावी, यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी सुचवल्याप्रमाणे सर्वांनी एकत्र बसून आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने फक्त पत्र देऊन किंवा भेट घेऊन प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी मराठा समाज मागासलेला आहे, हे सिद्ध करणारा अहवाल सोबत द्यावा लागेल. मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलेले पाच प्रश्न राज्य सरकारने तातडीने सोडवावेत. ते त्यांच्या हातात आहे. मात्र आजच्या भेटीमध्ये मराठा समाजासाठी ठोस काही घडले नाही असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.