पुणे - जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातल्या इंदापूर भागालाही पावसाने जबरदस्त झोडपले आहे. इंदापूर शहरातील रामवेस नाका येथे नगरपालिका कर्मचारी पाण्यात वाहून जात असताना त्याला नागरिकांनी त्याचे प्राण वाचविले आहेत.
इंदापूर शहराकडे येणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. तर ठिकठिकाणच्या ओढ्यांना नाल्यांना पूर आला आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे जोरदार पावसामुळे पूर आल्याने अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहने वाहून गेल्या आहेत. या जोरदार पाण्याच्या लोंढ्यात इंदापूर शहरातील रामवेस नाका येथे नगरपालिका कर्मचारी पाण्यात वाहून जात होता. यावेळी नागरिकांनी समयसूचकता दाखवित कर्मचाऱ्याला वाचविले. या कर्मचाऱ्याला वाचवितानाचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या कर्मचाऱ्याला जेसीबी आणि केबलच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे.
बारामती शहरातील नागरिकांची घरे पाण्याखाली
बारामतीत दिवसभर मुसळधार पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे शहरातील बहुतांश रहदारीच्या रस्त्यांवर गुडघ्या एवढे पाणी साचले आहे. विशेषतः बारामती शहरातील आमराई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतमधील जळोची येथे स्थलांतरित केलेल्या नागरिकांची घरे पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांच्या घरातील घरगुती वस्तू व महत्वाची कागदपत्रे पाण्याखाली गेली आहेत. तसेच नागरिकांसह जनावरांचे ही मोठे हाल झाले आहेत. सध्या सुमारे पाचशे ते सहाशे रहिवाशांची बारामती शहरातील सांस्कृतिक केंद्रात निवासाची सोय करण्यात आली आहे.