बारामती(पुणे) - सोलापूर जिल्ह्याची वरदायनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनीच्या पाण्याचा प्रश्न आता शरद पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानावर जाऊन पोहोचला आहे. उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ दुष्काळग्रस्त गावांना देण्याचा निर्णय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला होता. मात्र सोलापूर जिल्ह्यातील हा पाणी प्रश्न पेटवल्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द केला. या निषेधार्थ इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या निर्णायविरोधात इंदापूरच्या काही शेतकऱ्यांनी आज शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्पूर्वीच दोन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
![शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानावर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-01-baramati-political-av-10053_26052021112344_2605f_1622008424_528.jpg)
सोलापूर जिल्ह्यात उजणीच्या पाण्याचा प्रश्न पेटल्यानंतर अजित पवारांनीही कोणी कोणाचे पाणी पळवणार नसल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी भरणे यांचा निर्णय रद्द केला. त्यावर इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले, आणि आज त्यांनी दत्तात्रय भरणे यांनी घेतलेला ५ टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या निर्णय कायम ठेवण्यात यावा अशी मागणी करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत दोन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पवार यांच्या निवासस्थानी गोविंदबाग येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.