पुणे - जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या बेलवाडी येथे गुरूवारी ( ४ जुलै) मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचं पारणे फेडले. सणसर येथील मुक्कमानंतर तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे पहिल्या रिंगणासाठी बेलवाडी येथे ‘ज्ञानोबामाऊली-तुकाराम’ अशा जयघोषात आगमन झाले. पालखीचे स्वागत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, आणि ग्रामस्थांनी केले. त्यानंतर काही वेळातच रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली.
डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वाऱ्याच्या वेगाने परिक्रमा पूर्ण करत होत्या. त्यांच्यापाठोपाठ मानाचे विणेकरी, झेंडेवाले धावले. हरिदासांनी प्रदक्षिणा पूर्ण करून रिंगण सोहळ्यास चैतन्य प्राप्त करून दिले. यानंतर रिंगणात मानाच्या अश्वांचे आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला.वारकरी व भाविकांनी रिंगण सोहळ्या दरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले. यानंतर मानाच्या अश्व रिंगणाला सुरूवात होताच उपस्थित लाखो भाविकांनी ज्ञानोबा-तुकारामचा एकच जयघोष केला.
या जयघोषाने अवघे आसमंत दुमदुमले. यानंतर महिला-पुरूषांनी फुगड्यांचे फेर धरले. तर कोणी टाळ मृदुंगाच्या तालावर विठूनामाचा ठेका धरला. विठ्ठलाच्या दारी कोणी लहान-थोर नाही. या भावनेने प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडत होते.