पुणे - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. पुणे पोलीस रक्षक आहेत की भक्षक? त्यांनी याप्रकरणी काहीही तपास केलेला नाही. दोन प्रत्यक्षदर्शींना त्यांनी सोडून दिले, त्यामुळे त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली.
हेही वाचा - कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालणारे कोरोना योद्धे झाले बेरोजगार!
तपास अधिकारी बेजबाबदार
पूजा चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड हे या प्रकरणातील तपास अधिकारी आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी चित्रा वाघ आज (गुरुवारी) वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर त्यांची दीपक लगड यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली. त्यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप लावले. महाराष्ट्रातील एखाद्या सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करून चौकशी केली तरच या प्रकरणातील सत्य बाहेर पडेल, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
ज्या ठिकाणाहून आत्महत्या केली, त्या ठिकाणी पोहचल्या चित्रा वाघ
पूजा चव्हाणने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील हेवन पार्क या सोसायटीतील एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली, असे पुणे पोलिसांकडून सांगितले जात आहे. ज्या ठिकाणाहून पूजाने उडी मारून आत्महत्या केली त्या ठिकाणी जाऊन चित्रा वाघ यांनी पाहणी केली. पूजा राहात होती तो फ्लॅट पोलिसांनी सील केला आहे. परंतु, त्याच इमरातीमध्ये असणाऱ्या दुसऱ्या एका फ्लॅटमध्ये जाऊन चित्रा वाघ यांनी या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. इमारतीवर जाण्यासाठी रस्ता कुठून आहे? ग्रील आहे का? ही घटना कशी घडली असेल? किती उंचीवरून पूजा पडली, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला, असे वाघ म्हणाल्या. या इमारतीला टेरेस नाही. पूजा राहत असलेल्या फ्लॅटमध्ये बाल्कनीला कठडा आहे. पूजाची हाईट किती होती, हे मला माहीत नाही, परंतु वर चढायचे असेल किंवा उडी मारायची असेल तर त्या कठड्यावर जावेच लागेल. त्यामुळे, ती स्वतः वर गेली होती की तिला कोणी ढकलून दिले, हे पोलिसांनी सांगितले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन आतापर्यंत केलेल्या तपासाविषयी त्या विचारणा करणार आहेत.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली आहे. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी होती. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती, अशी माहिती समोर येत आहे. संजय राठोड यांच्यावर पूजाच्या हत्येचे आरोप झाल्यानंतर ते काही दिवस माध्यमांपासून दूर होते. मंगळवारी (२३ फेब्रुवारी) ते वाशिममधील पोहरादेवी येथे पहिल्यांदा माध्यमांसमोर आले.
हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्या; चित्रा वाघ यांची मागणी