पुणे - शिरूर तालुक्यात मंगळवारी रात्री एका महिलेचा छेड काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला तिने विरोध केला असता तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यामध्ये तिच्या दोन्ही डोळ्यांना जबर इजा झाली असून दोन्ही डोळ्यांची दृष्टी कायमची गेली आहे. या घटनेवरून आता राजकारण तापताना दिसत आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
शिरूरमध्ये घडलेली घटना ही अतिशय क्रूर अशी घटना आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. आज त्या महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार ? फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणल्याने तुमची जबाबदारी संपते का ? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. आज संपूर्ण राज्यात लेकीबाळीवर अत्याचार सुरू आहेत. अहमदनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरात महिलांवर होणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी कोण घेणार? बॉलीवूडला आम्ही धक्का लागू देणार नाही असे म्हणतात आणि तुमच्यासाठी ही सर्वसामान्य जनता महत्त्वाची नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सत्ताधारी पक्षातले महत्त्वाचे नेते पुण्यात राहतात, त्यातील एकानेही या घटनेची दखल घेतली नाही. सत्तेत बसल्यानंतर महिलांवरील प्रश्नांचे गांभीर्य कमी झाले का? या घटनेवर सरकारची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे.
प्रकरण काय आहे?
शिरूर तालुक्यात असलेल्या न्हावरे गावात एका नराधमाने महिलेचा विनयभंग करणाऱ्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला म्हणून त्याने महिलेला जबर मारहाण केली. या मारहाणीत तिच्या दोन्ही डोळ्यांना जबर इजा झाली आणि दोन्ही डोळ्यांची दृष्टी कायमची गेली आहे. महिलेला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.