बारामती - इंदापूर शहरानजीक असलेल्या सरस्वती नगर येथील घरामध्ये चिंकारा जातीचे हरीण पाय बांधून ठेवले होते. त्यास कापण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परमेश्वर अंकुश काळे (वय 33 वर्षे, सरस्वती नगर, इंदापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शनिवारी रात्री आरोपीने आपल्या गोखळी-वडापुरी गावच्या हद्दीतील शेताजवळ वनीकरणातील चिंकारा हरणास सापळा व फास्याद्वारे पकडले. त्यास सकाळी शहरातील सरस्वती नगर भागातील आपल्या घरी आणून संतुराच्या सहाय्याने कापण्याच्या तयारीत होता. याबाबतची माहिती मिळताच इंदापूर पोलीस त्याच्या घरी पोहोचले. आरोपीला अटक करून हरणाची सुटका केली. यावेळी हरणाच्या पायाला बांधून ठेवले होते. तर शेजारी सत्तुर पडलेला होता, असे पोलिसांनी सांगितले.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यासह काका पाटोळे, विशाल चौधर, विक्रम जाधव यांनी ही कारवाई केली.