बारामती - पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रतिबंधित क्षेत्र कोऱ्हाळे बुद्रुक गावाला भेट देत परिस्थितीची माहिती घेतली. कोऱ्हाळे बुद्रुक गावात नुकतेच कोरोनाचे 4 रुग्ण सापडले आहेत. त्यात एका नव्वद वर्षीय रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने पूर्ण गाव सील करून २८ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गावाला भेट दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर, पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप धापटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, आरोग्य व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुष प्रसाद म्हणाले की, प्रत्येकाने प्रशासनाच्या सूचना पाळल्या पाहिजेत. लहान मुले व जेष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण त्यांना पुन्हा रिकव्हर करणे अवघड असते. याशिवाय काही लक्षणे असल्यास तत्काळ कोरोनाची तपासणी करून घ्यावी. क्वारंटाईनच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात. तुमच्या कुटुंबातील लोकांची काळजी वाटत असेल तर योग्य पद्धतीने क्वारंटाईन व्हा, असे त्यांनी सांगितले.