पुणे - मागील एक वर्षापासून पन्नास लाखाच्या खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यात फरार असणारा कुख्यात गॅंगस्टर छोटा राजनच्या पुतणीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय 36, अनिता अपार्टमेंट, जांभुळकर चौक, वानवडी) असे तिचे नाव आहे. राजनची पुतणी असल्याचे सांगून धमकी देत तिने 25 लाखांची खंडणी मागितली होती. लष्कर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा - पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही लसीकरण बंद; नागरिक हवालदिल
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रियदर्शनी निकाळजे हिने "मी गॅंगस्टर छोटा राजनची सख्खी पुतणी असून त्यांचा व माझा डीएनए एकच आहे, जीव प्यारा असेल तर पन्नास लाख रुपये दे" असे म्हणून एका व्यक्तीकडे खंडणी मागितली होती. तेव्हा संबंधित व्यक्तीने लष्कर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 25 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना प्रियदर्शनी निकाळजे हिचा साथीदार धीरज साबळे याला रंगेहात पकडले होते. तर, प्रियदर्शनी फरार झाली होती.
दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असताना प्रियदर्शनी ही वानवडी येथील आपल्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला अटक केली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली.
हेही वाचा - अवैध शस्त्रसाठा जवळ बाळगणाऱ्या दोन सराईतांना चाकण पोलिसांकडून अटक