पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाबद्दल जे आक्षेपार्य विधान केलं, त्यानंतर त्यांना राज्यभरात मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं. याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले, की अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी म्हण ऐकली आहे. पवार साहेबांचा जो गट उरला सुरला आहे तो संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही. त्यांचे जे सो कॉल्ड नेते आहेत तेच त्यांना संपवतील अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिलीय.
हळूहळू मागण्या वाढत चालल्या : राज्यात अजूनही मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. याबाबत भुजबळ यांना विचारलं असता, ते म्हणाले की आपण पाहात आहोत की सातत्याने कुणबी प्रमाणपत्र दाखले चुकीच्या पद्धतीने सापडत आहेत. लिंगायत आणि इतर समाजाचा पण प्रश्न आहे. कुणाकुणाला दाखले देणार आणि ओबीसीमध्ये आरक्षण देणार असं सर्वत्र सुरू आहे. हळूहळू मागण्या वाढत चालल्या आहेत. संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या असं त्यांचं म्हणणं आहे. संपूर्ण मराठा नेत्यांची ही मागणी नाही, पण काही नवनिर्मित नेत्यांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत. म्हणून ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्याला आम्ही विरोध हे करणारच आहोत असंही ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात जातीय जनगणना करा : मागासवर्ग आयोगाने काही नवीन नियमावली बनविली आहे. याबाबत भुजबळांना विचारलं असता, ते म्हणाले की आयोगाने जे सर्वेक्षणाच्या बाबतीत म्हटलं होतं की १५ दिवसांत सर्वेक्षण होऊ शकतं. जर, ते होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय जनगणना करा. तसंच, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. पण ओबीसीतून आरक्षण द्यायला आमचा विरोध असल्याचंही भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.
काही पुरावे सापडले : मराठवाड्यामध्येच कुणबी प्रमाणपत्र कमी सापडलेली पाहायला मिळत आहेत. याबाबत भुजबळ यांना विचारलं असता, ते म्हणाले की याबाबत शिंदे समिती काम करत आहे. दोन ते तीन कोटी कागद तपासले आहेत. जे काही पुरावे सापडले असतील ते त्या प्रमाणे गोष्टी करत आहेत. तसंच, शिंदे समितीच्या निधीबाबत म्हणाले की, आतापर्यंत जे काही आयोग काम करत होते. त्यांना मिळत नव्हते पण आत्ता यांना मिळत आहेत ही चांगली गोष्ट आहे.
हेही वाचा :
1 आता ८० वर्षाच्या व्यक्तींनी मार्गदर्शन करावे, अजित पवारांचा शरद पवारांना टोला
2 मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण सात दिवसात करा, राज्य सरकारचे प्रशासनाला आदेश
3 भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, पण कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही- जितेंद्र आव्हाड