पुणे - गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, चासकमान जलाशय ओव्हरफ्लो झाले आहे. चासकमानमधून 1,850 क्युसेसने भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील पश्चिमेकडून गेल्या 48 तासापासून पावसाचा जोर वाढला असल्याने, डोंगररांगातून ओढे, नाले दुथडी भरुन वाहत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे, नद्यांची पाणीपातळी वाढली असून, पुलांवरुन तसेच बंधाऱ्यांवरुन पाणी जात आहे. त्यामुळे अनेक गावांत धोक्याची परिस्थिती निर्माण होत आहे. नागरिकांनी पाण्याजवळ जाणे टाळावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आहे.
इंद्रायणी, भीमा, भामा, घोड या नद्या सध्या दुथडी भरुन वाहत आहेत. चासकमान, भामा-आसखेड, डिंबा, माणिकडोह, वडजगाव, पिंपळगाव, जोगे आणि येडगाव या धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर काही दिवसांतच सर्व धरणे भरतील असा अंदाज वर्तविला जात आहे.
इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढल्याने मोई-चिखली पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे इंद्रायणी काठच्या गावांनाही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.