पुणे: महिलांना गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले. परंतु आता मात्र पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या केवळ स्वतःचीच नव्हे, तर समाजाची ही प्रगती करण्यात अग्रेसर आहेत. भविष्यात समाजाची वाटचाल अधिक गतीने होण्यासाठी महिलांच्या हाती समाजाची सूत्रे द्यायला हवीत, अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुढील काळामध्ये हुशारीपेक्षा प्रामाणिकपणाला अधिक महत्त्व येणार आहे. महिला या पुरुषांपेक्षा अधिक प्रामाणिक असतात. त्या घराबरोबरच समाजातही अधिक प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे काम करतात. त्यामुळे पुढील काळामध्ये महिलांना विविध क्षेत्रांमध्ये अधिक संधी निश्चितच निर्माण होणार आहेत.
महिलेला प्रोत्साहनाची गरज: यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या महिलांना संघर्ष चुकलेला नाही. प्रवाहाच्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येक महिलेला संघर्ष करावाच लागतो. परंतु आजही कोणत्याही क्षेत्रामध्ये महिलेला प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागते, हे समाजाचे दुर्दैव आहे. हेमंत रासने म्हणाले की, प्रत्येक महिलेला प्रोत्साहनाची गरज असते. त्यामुळे समाजाच्या हिताचे काम करणाऱ्या महिलांना प्रेरणा मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी समाजाने महिलांच्या पाठीशी उभे राहणे, ही काळाची गरज आहे.
स्त्री असण्याचा अभिमान बाळगला पाहिजे: पुरस्काराला उत्तर देताना अनुराधा मराठे म्हणाल्या, महिलांनी घराबाहेर पडून आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजविले पाहिजे. नलिनी वायाळ म्हणाल्या, तळागाळातील स्त्रियांची कामे समाजासमोर आणणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांनी प्रथम आपला न्यूनगंड दूर केला पाहिजे. अनुराधा प्रभूदेसाई म्हणाल्या, नारीशक्तीचे ज्वलंत दर्शन हे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नी, बहीण आणि मातांमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या दुःखामध्ये समाजाने कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. सुनिता राजे पवार म्हणाल्या, स्त्री असण्याचे दुःख ज्या स्त्रियांना वाटते त्या कधीही समाजामध्ये प्रगती करू शकत नाही. त्यामुळे स्त्री असण्याचा प्रत्येकीने अभिमान बाळगला पाहिजे.
समाजामध्ये सकारात्मक बदल: कनिका रॉय म्हणाल्या, महिलांची परिस्थिती सुधारल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही. प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी गुण असतात, त्या गुणांचा समाजाने आदर केला जातो. स्वाती दैठणकर म्हणाल्या, कलेच्या माध्यमातून महिला या केवळ समाजाचे मनोरंजन करू शकत नाहीत, तर त्या समाजामध्ये सकारात्मक बदलही निश्चितपणे घडवू शकतात.
हे होते उपस्थित: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक हेमंत रासने मित्र परिवारातर्फे बाजीराव रस्त्यावरील प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या स्त्री शक्ती सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राजेश पांडे, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक हेमंत रासने, मृणालिनी रासने यावेळी उपस्थित होते. लक्ष फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई, डीआरडीओच्या शास्त्रज्ञ कथिका रॉय, भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर, ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, प्रकाशक सुनिता राजे पवार, मातृशक्ती संस्थेच्या नलिनी वायाळ यांना यावेळी स्त्री शक्ती सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, फळांची परडी असे सन्मानाचे स्वरूप होते.