पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पदाला 28 मेपर्यंत कुठलाही धोका नाही. त्याला आणखी वेळ असताना एवढी घाई का? असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. राज्यात कोरोनाचे तांडव असताना मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठक घेऊन राज्यपालांकडे मुख्यमंत्री ठाकरेंच्या नावाची शिफारस करणे घटनाबाह्य असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे हे विधीमंडळाच्या कुठल्याही सदनाचे सदस्य नाहीत. त्यामुळे घटनेनुसार पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आता विधीमंडळावर नियुक्त होणे आवश्यक असते.
आम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पैसै पाठवले का?
भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीऐवजी 'पीएम केअर फंड'मध्ये पैसै टाकले यावर उत्तर देताना, आम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पैसै पाठवले का, असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला. केंद्र सरकारच्या पीएम रिलिफ फंडला पैसे द्यायला हरकत नाही. केंद्र सरकारने सर्वाधिक साहित्य महाराष्ट्राला दिले असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.
महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कामगारांना पोहोचवावे. हे करताना सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग करुन बसमध्ये कामगारांना बसवण्यात यावे आणि त्यांच्या गावांमध्ये पोहचवण्यात यावे, असेही पाटील म्हणाले. पुणे आणि मुंबईतील प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस आयुक्तांची भेट घेऊन भाजपच्या नेते काही मागण्या करत असल्याची माहितीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.