पुणे- एकनाथ खडसेंना पक्षाने आजवर सात वेळा विधानसभा सदस्य, दोन वेळा मंत्रीपद, विरोधीपक्षनेतेपद, सुनेला खासदारकी, मुलीला जिल्हा बँकेचे चेअरमनपद, बायकोला महानंदाचे चेअरमनपद असे खूप काही दिले. हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी रद्द करुन त्यांनी सुनेला खासदारकीची उमेदवारी दिली. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा त्यांनी करू नये, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
'पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा नाथाभाऊंनी करू नये, यामुळे कटुता वाढेल'
हरिभाऊ जावळे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली असतानाही एकनाथ खडसे यांनी त्यांची उमेदवारी रद्द करायला लावून स्वतःच्या सुनेला उमेदवारी दिली. जगवाणी विधानसभेचे आमदार असताना खडसे यांनी त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली. त्यामुळे खडसेंनी खंजीर खुपसण्याची भाषा करू नये. यामुळे कटुता वाढेल. माध्यमांसमोर जाऊन अशाप्रकारची भाषा करणे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.
एकनाथ खडसे यांना पक्षाने आजवर सात वेळा विधानसभेवर पाठवले. दोन वेळा मंत्रीपद, एक वेळ विरोधीपक्षनेतेपद, सुनेला खासदारकी, मुलीला जिल्हा बँकेचे चेअरमनपद, बायकोला महानंदाचे चेअरमनपद असे खूप काही दिले. त्यामुळे आमदारकी मिळाली म्हणजेच काम करणे होते असे नाही. कार्यकर्ता, नेता, पालक म्हणूनही पक्षात काम करता येते. असा विचार करुनच पक्षानेत्रत्वाने त्यांना तिकीट नाकारले असेल. भारतीय जनता पार्टी वैचारिक अजेंडा पूर्ण करण्यासाठी निर्माण झाली आहे. पक्षाची कार्यपद्धती ही भारतीय विचारांवर आधारित आहे. त्यामुळे घरातील भांडण घरात अशी पक्षाची भूमिका आहे. इतरांच्या ताटातील काढू नका, इतरांना मोठे करण्यात आनंद माना, एकमेकांत भांडू नका अशी हिंदू संस्कृती सांगते. त्यामुळे त्या कार्यपद्धतीत सर्वांनी रहावे, अशी पक्षाची अपेक्षा आहे. एकनाथ खडसे यांचा स्वभाव पाहता वारंवार अंगावर जाणे याची दखल पक्षनेतृत्वाने घेतली असेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.हेही वाचा- रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार; परंतु ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ