आळंदी (पुणे) - संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 724 वा संजीवन समाधी सोहळा अलंकापुरीमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी समाधी मंदिरात हरिनामाच्या गजरात माऊलींवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. दरवर्षी संजीवन समाधी सोहळ्याला हजारो भाविक आळंदीत येत असतात मात्र, यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत माऊलींचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला.
धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपत संजीवन समाधी सोहळा साजरा
सहा दिवसांपूर्वी हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने आळंदीमध्ये माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली होती. यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माऊलींचे मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिर परिसरामध्ये माऊलींचा संदेश देणारी रांगोळी काढण्यात आली होती.
देवाची आळंदी भाविकांविना सुनी सुनी
आषाढी वारीच्या धर्तीवर यंदाची कार्तिकवारी व संजीवन समाधी सोहळा व्यवस्थित पार पडावा, यासाठी पोलिसांनी आळंदी देवस्थान प्रशासनासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभीवर सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संजीवन समाधी सोहळ्याच्या काळात आळंदीमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. आळंदीत येणाऱ्या भाविकांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे यंदा प्रथमच भाविकांच्या अनुपस्थितीमध्ये हा संजीवन समाधी सोहळा पार पडला.