पुणे - चोरून वीज वापरणाऱ्या इंदापूर तालुक्यातील पाच जणांविरोधात भारतीय विद्युत अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. विजय जनार्दन खामगळ, शिवाजी मारूती भोसले, नर्मदाबाई धोंडीराम काटकर, किसन बापू तिकोटे व अनिल धनाजी जाधव (सर्व रा.वडापुरी ता.इंदापूर), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता युवराज दत्तात्रय जाधव यांनी फिर्याद दिली.
महावितरणकडून सध्या 'आकडे हटवा, कनेक्शन वाढवा' ही मोहीम सुरू आहे. दत्तात्रय जाधव यांच्याकडे महावितरणची वसुली करणे, नवीन कनेक्शन देणे, लाईन दुरुस्ती करणे, वीज चोरी रोखणे ही कामे आहेत. ते सहकाऱ्यांसह आपल्या कार्यक्षेत्रात वीज चोरी रोखण्यासाठी पाहणी करत होते. त्यावेळी वडापुरी येथे काही नागरिक एलटी लाईनवर हुक टाकून चोरीची वीज वापरल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून आकड्यांची केबल जप्त करण्यात आली असून, वीज चोरीचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये राबवण्यात आली होती बक्षीस योजना -
नांदेडमध्ये नोव्हेंबर महिन्यात महावितरणच्यावतीने 'वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा' ही योजणा राबवण्यात आली होती. या योजनेअंतर्गत वीज चोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या दहा टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली गेली. वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे वीजचोरी विरुद्ध सातत्याने मोठ्या प्रमाणावर मोहिमा राबवण्यात येतात. तरी देखील काही वीजग्राहक नव-नवीन युक्त्या वापरून विजेची चोरी करत असतात.