पुणे - एका महिला डॉक्टरने रुग्णाला कॅन्सर झाल्याचे सांगत तब्बल दीड कोटीचा गंडा घातला. उपचारासाठी महिला रुग्णाने पगारातून केलेली बचत, प्रॉव्हिडंट फंट, मुदत ठेवी, पोस्टातील ठेवी, घरभाडे तसेच पतीच्या व्यवसायातून बचतीतील सर्व पैसे डॉक्टरला दिले. यानंतरही डॉक्टरने पैशाचा तगादा लावल्यावर रुग्ण महिलेच्या पतीने डॉक्टरच्या उपचाराचा भांडाफोड केला. याप्रकरणी संबधीत महिला डॉक्टरवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रिपोर्ट न दाखवताच कॅन्सर असल्याचे सांगितले -
फिर्यादी सुषमा या संरक्षण खात्यात ऑडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एका मैत्रीणीमार्फत डॉ. विद्या यांच्याशी ओळख झाली होती. दरम्यान, सुषमा यांनी अर्धशिसी व गुडघेदुखीवर 2017 मध्ये डॉ.विद्या यांच्याकडे उपचार घेतले होते. तर, 2019 मध्ये त्यांना अन्न नलिकेचा त्रास होत असल्याने त्यांनी डॉ.विद्या यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी विद्या यांनी आपण कॅनडाच्या एका आयुर्वेदीक संस्थेची फ्रँचाईजी घेतली असून त्याचा शहरातील अनेक रुग्णांना लाभ झाला असल्याचे सांगितले. डॉक्टरने सुषमा यांना व्हॉटसअॅपवर नाभिचा फोटो पाठवण्यास सांगितले. तो फोटो कॅनडातील संस्थेकडे पाठवून रिपोर्टमध्ये लिव्हर असायटीस झाल्याचे सांगितले. रुग्णाला अथवा कुटूंबीयांना रिपोर्ट गोपीयन असल्याने पुर्ण बरे होईपर्यंत दाखवत नसल्याचे सांगितले. डॉ. विद्यावर फिर्यादीने विश्वास ठेवत उपचार सुरू करण्यास सांगितले.
फक्त नाभीचा फोटा पाहून केले कॅन्सरचे निदान!
यानंतर सुषमा यांना औषधाची चिठ्ठी व रिपोर्ट न देता फक्त गोळ्या देण्यात येत होत्या. 2020 मध्ये पुन्हा नाभिचा फोटो पाठवायला सांगून लिव्हरच्या वरच्या भागात कॅन्सरची गाठ आल्याचे सांगितले. यासाठी सात लाख रुपये आगाऊ मागितले. मात्र, सुषमा यांच्याकडील सर्व पैसे संपल्याने त्यांनी पतीकडे पैसे मागितले. पतीने पैशाबाबत विचारणा केली असता, सुषमा यांनी उपचाराबाबत माहिती दिली. पतीने आजाराची कागदपत्रे व रिपोर्ट मागितले मात्र, डॉ. विद्या यांनी ते दिलेच नाहीत. यामुळे त्यांचा संशय बळावला. त्यानंतर सुषमा यांच्या पतीने एका वकिलासह डॉ. विद्या यांची भेट घेतली. तेव्हाही डॉ. विद्या यांनी आजार बरा झाल्याशिवाय रिपोर्ट देता येत नसल्याचे सांगितले. म्हणून फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अहिवळे करत आहेत.