पुणे - मावळ तालुक्यातील टाकवे येथे भरधाव वेगात असलेली स्विफ्ट डिझायर कार इंद्रायणी नदीवरील लोखंडी बारचा कठडा तोडून थेट नदीत पडल्याची घटना घडली. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा शोध शिवदुर्ग आणि एनडीआरएफचे पथक घेत आहे.
आज (गुरुवारी) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून ३ जण कारसह नदीत पडले होते. यापैकी १ जण पोहत बाहेर आला होता, तर २ जण नदीत पात्रात बुडाले होते. संकेत नंदू असवले, असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अक्षय मनोहर जगताप याचा शोध घेतला जात आहे. अक्षय संजय ढगे हा पोहत नदीबाहेर आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत नंदू असवले, अक्षय जगताप आणि अक्षय ढगे हे सर्व जण एका कारने कान्हे फाटा येथून टाकवेच्या दिशेने येत होते. मात्र, भरधाव वेगात असलेल्या कार चालक संकेतचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि पुलाचे लोखंडी बार तोडून कार थेट इंद्रायणी नदी पात्रात पडली. यातील अक्षय पोहत तात्काळ बाहेर आला तर २ जण नदीत बुडाले. त्यांचा शोध शिवदुर्ग पथक आणि एनडीआरएफचे पथक घेत होते. घटनास्थळी पाणबुड्या देखील दाखल झाल्या होत्या. संध्याकाळी १० वाजण्याच्या सुमारास नदीमधून दुचाकी बाहेर काढली असून यात संकेतचा मृतदेह मिळाला आहे. अक्षय याचा शोध दोन्ही पथक घेत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी वडगाव मावळ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे स्वतः हजर होते. तसेच पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते.