पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अंमलीपदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 68 हजार रुपये किमतीचा 2 किलो 723 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. सोमवारी उशिरा ही कारवाई करण्यात आली. नितीन विश्वनाथ झेंडे (वय-38), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी नितीन हा ग्रामीण भागातून पिंपरी-चिंचवड शहरात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमलीपदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, अंमलीपदार्थ विरोधी पथकाने रावेत येथील बीआरटी मार्गजवळ सापळा रचून आरोपी नितीन विश्वनाथ झेंडे याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता 2 किलो 723 ग्रॅम वजनाचा गांजा त्याच्याकडे आढळला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी दादा रमेश धस यांनी फिर्याद दिली आहे.