पुणे - विरोधकांना सत्ता न मिळाल्याने पाण्याबाहेर असलेल्या माशा सारखी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे सरकारवर उठसुठ टीका सुरू असल्याचा टोला महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना लगावला आहे. राज्यात मंत्रीपद वाटपावरून सुरू असलेल्या घोळावर विरोधक टीका करत आहेत. त्याला बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जरी मी घेतले नाही, तरीही मी त्या जिल्ह्याचा पालकचं आहे. पक्षातला मी एक वरिष्ठ सदस्य आहे, प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मंत्रीपदावरून राज्यात सुरू असलेल्या नाराजी नाट्याबाबत बोलताना थोरात म्हणाले, काही लोक नाराज होत असतात. सध्या राजकारणाला वेग आलेला आहे, तीन पक्षाचे सरकार आहे. मात्र, मंत्रिपदाच्या जागा कमी आहेत. त्यामुळे चांगले नेतृत्व असतानाही त्यांना संधी देता आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यातून थोडी नाराजी येत असते. मात्र, या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
काँग्रेसचे जालन्याचे आमदार गोरंट्याल यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. यावर बोलताना त्यांची नाराजी दूर केली जाईल, मी त्याच्याशी संवाद साधतो आहे. ते आमच्या सोबत राहतील, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. तसेच एकर आणि हेक्टर मधला फरक कळूनही भाजपचे लोक शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकले नाहीत. आम्ही मात्र शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेऊ, असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.
पुण्यात केसरी वर्तमानपत्राच्या 139 व्या वर्धापनदिन निमित्त लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार पारितोषिक प्रदान कार्यक्रमाला बाळासाहेब थोरात आले होते. यावर्षीचा हा पुरस्कार दैनिक जागरणचे मुख्य संपादक संजय गुप्ता यांना देण्यात आला या कार्यक्रमाला बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.