आंबेगाव(पुणे)- Buzzer Goggle : राज्यात काही दिवसांपूर्वी नागपूर शिर्डी यासह अनेक शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग सुरू झाला. मात्र समृध्दी महामार्ग तयार झाल्यानंतर या महामार्गावर सातत्यानं अपघाताच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत या अपघातात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जण जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावर होणारे अपघात हे शक्यतो रात्रीच्या वेळी चालकाचे गाडीवरून सुटलेले नियंत्रण, चालकाची झोप पूर्ण न होणे, चालकाला डुकली लागणे या कारणामुळे झाले आहेत. या गोष्टीचा विचार करुन इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं चालकाला डुलकी लागल्यास अलर्ट देणाऱ्या गॉगलची निर्मिती केली आहे. आयुष घोलप असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.
लहानपणापासूनच विज्ञानाची आवड : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या आयुषला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड असल्यानं तो वेगवेगळे प्रयोग करत असतो. आयुष शाळेत अतिशय हुशार व चाणाक्ष असून नेहमी नवनवीन कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतेच शालेय विज्ञान प्रकल्प विषयात रस्त्यावरील अपघात कमी होण्यासाठी मदत करणारा गॉगल आयुषनं बनवला आहे. रात्रीच्या वेळी लांबच्या पल्यावर जाणारे सर्व अवजड वाहन चालक, ट्रॅव्हल बस, परराज्यात जाणारे ट्रक व इतर अनेक वाहन चालक या गॉगलचा वापर करू शकतात. हा गॉगल वाहन चालकाने घातल्यानंतर त्यानं डोळे झाकले तर चालकाला अलर्ट करणारे बझर वाजेल.
गॉगल बनवण्यासाठी वापरले हे साहित्य: आयुषने गॉगल तयार करण्यासाठी सेन्सर, बटन, बजर, गॉगल, बॅटरी, चार्जर इत्यादी साहित्याचा वापर केला आहे. यासाठी फक्त अडीचशे रुपये खर्च आला आहे. भविष्यात या गॉगलवर तज्ज्ञांच्या माध्यमातून अभ्यास करून हा गॉगल अजून विकसित करून वापरात आला तर हजारो वाहन चालकांचे व प्रवाशांचे प्राण वाचू शकतील. दरम्यान, आयुषनं बनवलेल्या या आगळ्यावेगळ्या गॉगल प्रयोगाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.
हेही वाचा -
- Samruddhi Mahamarg Accident : अपघातात नात अन् सुनेचा मृत्यू; सासूचा मन सुन्न करणारा आक्रोश, गावावर शोककळा
- Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर १२ जणांचा मृत्यू, पंतप्रधान कार्यालयाकडून मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर
- Accident on Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर अपघात मालिका सुरूच; कार अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी आणि मुलगी जखमी