पुणे - भाजपचा बालेकिल्ला म्हणून कोथरूड विधानसभा मतदार संघाची ओळख आहे. या मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. परंतु येथील ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटील यांच्या नावाला विरोध दर्शविला आहे.
विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी पुन्हा तिकीट मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनीही कोथरूड विधानसभा मतदार संघातून तिकीट मिळावे यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. परंतु चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील ब्राह्मण वर्चस्व असलेला हा मतदार संघ नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या बाजूने ठामपणे उभा राहिलेला आहे. त्यामुळेच पहिल्यांदाच लोकांतून निवडून जाण्याचा प्रयत्न करणारे तसेच शिवसेनेने पाटील यांच्यासाठी जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीने सोयीचा आणि सुरक्षित मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जात आहे.
हेही वाचा - शिंगवे येथे मीना नदीपात्रात पोहायला गेलेली तीन मुले पाण्यात बुडाली, शोधकार्य सुरु
या पार्श्वभूमीवर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे ब्राह्मण मतदारांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने त्यांच्या नावाची घोषणा होण्याआधीच ब्राह्मण महासंघाकडून विरोध सुरू झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देऊ नये, या मतदारसंघातून ब्राह्मणच उमेदवार उभा केला गेला पाहिजे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली. चंद्रकांत पाटील जर उमेदवार असतील तर त्यांना ब्राह्मण महासंघाचा विरोध असेल, असा इशाराही ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे
हेही वाचा - ..राहिलेल्यांची उमेदवारी पवार जाहीर करतील; बापटांचा अजित पवारांवर टोला