पुणे - चाळीस लाखाच्या खंडणीसाठी मित्राने तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अब्दुल अहाद तय्याब सिद्दीकी (वय 17, रा. भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात अब्दुलचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी मृताच्या एका मित्राला अटक केली आहे. उमर शेख (वय २१) असे या आरोपीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे 'खतरनाक खिलाडी 2' हा चित्रपट पाहून आरोपीने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मृत अब्दुल सिद्धिकी हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. ४२ लाख रुपयांची महागडी गाडी घेण्यासाठी आरोपी मित्राने अब्दुलचा गळा आवळून खून केला. आरोपी उमरने चित्रपट पाहून अपहरणाची योजना आखली. शनिवारी रात्री उमर मृत अब्दुल याला पार्टीसाठी घेऊन गेला. तिथे दोघांनी मद्य प्यायले त्यानंतर आरोपीने अब्दुलचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याच्याच फोनवरून अब्दुलच्या भावाला आणि एका मित्राला फोन करून खंडणीची मागणी केली. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ भोसरी पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार दिली.
हेही वाचा - जालन्यात व्यापारी राजेश नहार यांची गोळ्या झाडून हत्या
तक्रार दाखल होताच पोलिसांनी अब्दुल सिद्दीकीचा शोध सुरू केला. रविवारी पहाटे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. जलद गतीने तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. उमरने खून केल्याची कबुली दिली असून चित्रपट पाहून त्याने हे कृत्य केल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली.