पुणे - इस्रोकडून 15 जुलै ला 'चंद्रयान 2' चे प्रक्षेपण होणार असून, या प्रक्षेपणासाठी पहिल्या टप्प्यामधील महत्त्वाची 'बूस्टर केसिंग' पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या वालचंदनगर कंपनीच्या अभियंत्यांनी तयार केली आहे. कुठल्याही क्षेपणास्त्राला अंतराळात झेपावण्यासाठी पहिल्या स्टेजमध्ये बूस्टर प्रणाली महत्त्वाची असते.
![CHANDRAYAAN 2](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhpun02chandrayaancontributionpkg7201348_12072019182421_1207f_1562936061_1071.jpg)
अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) वतीने अवकाश मोहिमा राबवण्यात येतात. वालचंद उद्योग समूह 1973-74 पासून इस्रोला मदत करतो. चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी ही मोहिम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने यासाठी खास व्यवस्था केली आहे. यासाठी लागणारे पोलाद इस्रोने उपलब्ध करून दिले आहे. त्यावर प्रक्रिया करण्याचे अत्यंत अवघड काम वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये करण्यात आले.
![CHANDRAYAAN 2](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhpun02chandrayaancontributionpkg7201348_12072019182421_1207f_1562936061_935.jpg)
अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी भारताकडे पीएसएव्ही आणि जीएसएलव्ही मार्क 3 ही प्रक्षेपास्र आहेत. ते अवकाशात पाठवण्यासाठी बूस्टर गरजेचे असते. या बूस्टरमध्ये सॉलिड इंधन असते. यानाला ऑरबीटच्या बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी बूस्टरची असते. ही क्षमता असणारा भारत जगातील पाचवा देश ठरला आहे. इस्राने अंतराळ मोहिमा आखत देशाचा लौकिक वाढवला आहे.
![CHANDRAYAAN 2](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhpun02chandrayaancontributionpkg7201348_12072019182421_1207f_1562936061_1036.jpg)
या मोहिमांसाठी लागणारी महत्त्वाची प्रणाली बनवण्याची जबाबदारी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी वालचंदनगर इंडस्ट्रीला दिली आहे. ही जबाबदारी या कंपनीच्या अभियंत्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
![CHANDRAYAAN 2](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhpun02chandrayaancontributionpkg7201348_12072019182421_1207f_1562936061_812.jpg)
काय आहे बूस्टर केसिंग प्रणाली -
![CHANDRAYAAN 2](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhpun02chandrayaancontributionpkg7201348_12072019182421_1207f_1562936061_155.jpg)
कुठल्याही प्रक्षेपास्त्राला अंतराळात झेपावण्यासाठी पहिल्या स्टेजमध्ये बूस्टर प्रणाली महत्त्वाची असते. या बुस्टरमध्ये घनरूपातील इंधन असते. या इंधनाच्या जोरावर प्रक्षेपास्त्र अवकाशात पाठवले जाते. प्रक्षेपास्त्राला हवेत दिशा देण्यासाठी लागणारी एस 200 फ्लेक्स नॉझल कंट्रोल टँकेज यंत्रणाही वालचंदनगर उद्योग समूहातील अभियंत्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने विकसित केली आहे.
![CHANDRAYAAN 2](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhpun02chandrayaancontributionpkg7201348_12072019182421_1207f_1562936061_632.jpg)