पिंपरी- चिंचवड (पुणे) - महापालिका अंतर्गत चालवण्यात येणारी ग्रंथालये आणि वाचनालये सुरू करावीत, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले.
यावेळी महापौर ऊषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष राहुल खाडे, प्रफुल्ल थिटे, तेजस दरवडे, गणेश चव्हाण, अभिषेक हडवले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या सुरुवातीपासूनच शहरातील सर्व वाचनालये व ग्रंथालये बंदच होती. शहरातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15-20 दिवसांवर आलेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे खासगी वाचनालयात किंवा अभ्यासकेंद्रात प्रवेश घेणे अशक्य आहे. तसेच, खासगी वाचनालय व अभ्यास केंद्रातील जागा जवळपास पूर्ण भरलेल्या असल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता आणि सरकारद्वारे हळुहळु सर्व गोष्टी सुरू होत असताना वाचनालये व ग्रंथालये सुद्धा सुरू करण्यात यावीत. याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना केली अटक; 100 किलो चांदीसह पाऊण किलो सोने जप्त