पुणे - राज्यात येत्या एक डिसेंबर रोजी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुण लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पदवीधर संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगण्याची चिन्ह होती. मात्र आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटना या पक्षाने आपला उमेदवार उभा केला आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत रयत क्रांती संघटनेच्यावतीने एन डी चौगुले यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा-
यावेळी बोलताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले, भाजपचा घटक पक्ष म्हणून रयत क्रांती संघटना राज्यात काम करत आहे. सर्वच राजकीय पक्षांचा अजेंडा असतो. तसाच रयत क्रांती संघटनेचाही अजेंडा आहे. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवावी, अशी पुणे विभागातील कार्यकर्त्यांची इच्छा होती. संघटनेने यापूर्वी ग्रामीण आणि शहरी भागातील पदवीधरांच्या अडचणी सोडविण्यासाठी आंदोलन केले आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार ही निवडणूक लढविण्याचा निर्णय रयत क्रांती संघटनेने घेतला आहे.उमेदवार एन डी चौगुले यांनी यावेळी बोलताना पुणे विभागातील संपूर्ण पदवीधर आपल्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. पदवीधरांच्या, बेरोजगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपा उमेदवाराच्या अडचणीत वाढ-
दरम्यान, रयत क्रांती संघटनेकडून एन डी चौगुले यांनी अर्ज भरल्यामुळे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटना आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेणार की त्यांच्या बंडखोरीचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसणार, हे येणारा काळ ठरवेल.
हेही वाचा- जयंत पाटील यांनी फुकटात मिळालेली सत्ता हजम करावी, आमची चिंता करू नये - चंद्रकांत पाटील
हेही वाचा- पुण्यात नोकरीचे आमिष दाखवून मोबाईल आणि दुचाकी चोरणारा अटकेत