पुणे: सर्वोच्च न्यायालयात अभ्यासपूर्ण पद्धतीने सुनावणी झाली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे मी स्वागत करतो. भाजपने बेकायदेशीर सरकार आणले होते. या निर्णयाने लोकांनासुद्धा आता कळाले असेल की, एकाच पक्षाला एखादी बहुमत देणे हे योग्य नाही. यातून जनतासुद्धा याचा विचार करेल. एक प्रकारे सरकार अनधिकृत आहे याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे जरी हा निर्णय गेला असला तर नार्वेकरांचे हात बांधूनच हा निर्णय दिला गेला आहे; कारण एकनाथ शिंदे यांनी नेमलेले प्रतोद चुकीचे आहेत, असे त्यामध्ये स्टेटमेंट आहे. त्याचबरोबर पक्ष म्हणेल तेच बरोबर, पक्षप्रमुखांचे आदेशच बरोबर असतात हेसुद्धा त्यांनी कोर्टात सांगितले. यामुळे अनैतिक सरकार आणि त्या सरकारमध्ये सहभागी भाजप नैतिकतेला धरून तरी बाहेर पडेल का, हे पाहणे महत्त्वाचे आहे, असेसुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
तर पक्षचिन्ह आणि पक्षही मिळू शकतो: सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना 'जैसे ती' परिस्थिती का आणली नाही, यावरसुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्याकडून कायदेशीर सल्लागारांबद्दल थोड्या चुका झाल्या. त्या आणखी सुधारून ते चांगल्या रीतीने याला लढा देतील. जेणेकरून असे झाले तर उद्धव ठाकरेंकडे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षसुद्धा येऊ शकतो. त्यासाठी कायदेशीर निर्णय चांगले घेणे गरजेचे असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
तेव्हा आमचा निर्णय जाहीर करू: शिवसेनेने आता मोर्चे काढले पाहिजे आणि भाजपच्या राजीनामाची मागणी केली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी आक्रमक होत हे सर्व करणे गरजेचे आहे. आता सभा घेण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांना जागरूक करणे, कार्यकर्त्यांना कामाला लावणे फार महत्त्वाचे आहे. त्यांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही मित्र पक्ष म्हणून आमचाही निर्णय जाहीर करू, अशी प्रतिक्रियासुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे.
कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत: कोर्ट त्या पुढील सुनावणीमध्ये काय करणार ते पाहणे महत्त्वाचे आहे; परंतु एक चांगली अभ्यासपूर्ण सुनावणी झाली. अनेक मुद्दे निकाली काढण्याचा प्रयत्न झाला. दोन-चार मुद्दे आणखी तसे आहेत. त्याचा निर्णय आता कधी होईल ते माहीत नाही. तरी निर्णय अध्यक्षांकडे दिला तर त्याला वेळ किती दिला जाईल, अशी माझी अपेक्षा होती; पण ते या निर्णयात दिसत नाही. परंतु जो निर्णय आला त्याचे आम्ही स्वागत करत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.