पुणे Nitesh Rane Met Swati Mohol : भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी गुंड शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, स्वाती वहिनी हिंदुत्वच्या कामामध्ये नेहमी अग्रेसर असतात. असंख्य आमच्या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण एकत्र असतो. मोहोळ कुटुंबाचं हिंदुत्वासाठी काम हे निर्विवाद आहे. नेहमी जिथं जिथं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यासमोर कुठलाही प्रश्न किंवा आव्हान उभं राहिलं तेव्हा मोहोळ कुटुंब हे त्या कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले आहे. तसे असंख्य उदाहरणं आहेत, असं म्हणत या संकटाच्या काळात वहिनींबरोबर आणि कुटुंबाबरोबर उभं राहणं हिंदू म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे. माझ्या संस्कृतीमध्ये बसत असल्यामुळे मी आधार देण्यासाठी आणि त्यांनी हिंदुत्वाचं काम त्याच ताकदीनं पुढं घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी मी इथं उपस्थित राहिलो आहे, असं नितेश राणे म्हणाले.
आम्ही सगळे मोहोळ कुटुंबासोबत : मी काही राजकीय गोष्टीसाठी या ठिकाणी आलो नाही. या कुटुंबाचं आणि हिंदुत्वाबद्दल जे काय काम आहे ते त्यांनी सुरू ठेवावं. ताईंनी त्याच ताकतीनं पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी इथं आलेलो आहे. त्याचबरोबर हिंदुत्ववादी काम करणारे जे काही आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संकटकाळात जे काही घडलं त्याच्यामुळे कुठंही खचून जाता कामा नये. त्यांनी आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत. पोलीस योग्य तो तपास करत आहेत. स्वाती मोहोळ या रविवारी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या आहेत. म्हणून टप्प्याटप्प्यानं या तपासामध्ये नेमकं काय होतंय, ती माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या अन्य लोकांच्या माध्यमातून डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे. या संबंधित तपासामध्ये काय होतं ते येणाऱ्या काळात तुम्हाला समजेल, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.
गुन्हेगार म्हणून सांगणं चुकीचं: शरद मोहोळ यांच्या गुन्हेगारी जगताबाबत त्यांची प्रतिमा खराब केली जात आहे. त्यांची चुकीची प्रतिमा समोर आणण्याचा जो काही एक प्रयत्न सुरू ठेवलेला आहे त्या गोष्टीबद्दल कुटुंबाला आणि त्यांच्या जवळच्या लोकांना त्रास होतो आहे. ते गुन्हेगारी क्षेत्रामध्ये का आले? कसे आले? याची कोणालाच आपल्याला माहिती नाही आणि उगाच माहिती नसताना पण आपण त्यांची एक चुकीची प्रतिमा तयार करणे, हे आमच्या मीडियातल्या काही मित्रांनी थांबावावं. कारण अशा पद्धतीनं हिंदुत्ववादी समाज हिंदू समाजासाठी उभा राहणं सोपं नाही आणि एवढं मोठं आभाळा एवढं काम हिंदुत्वासाठी उभं केल्यानंतर अशा पद्धतीनं काही आमचे मीडियाचे मित्र चुकीच्या पद्धतीनं माहिती बाहेर देत असतील, तर निश्चित पद्धतीनं याबद्दल त्यांनी विचार करावा, असंसुद्धा आमदार नितेश राणे म्हणाले.
खुनाचे मास्टरमाईंड केव्हा सापडणार? स्वाती मोहोळ या भाजपाच्या पदाधिकारी आहेत. शरद मोहोळ गेले कित्येक दिवस हिंदुत्वाचं काम करत होते. भाजपाकडून शरद मोहोळ यांची हिंदुत्ववादी अशी प्रतिमा तयार केली जात असल्याची चर्चा आता होत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नितेश राणेही मोहोळ कुटुंबाच्या भेटीला त्यांच्या घरी गेले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ते आलेत का? असंसुद्धा बोललं जात आहे; परंतु या सगळ्यामुळे शरद मोहोळ यांच्या हत्येचे खरे मास्टर गुन्हेगार कधी सापडणार हा प्रश्न तसाच राहत आहे. पोलीस तपास करत आहेत आणि योग्य ती कारवाई होईल, अशी अपेक्षासुद्धा नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
नितेश राणे स्वाती मोहोळच्या पाठीशी: शरद मोहोळ यांची 5 जानेवारीला दुपारी दीडच्या सुमारास तीन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. पूर्व आयुष्यात शरद मोहोळ यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता गुंड शरद मोहोळ यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल होते. त्यानंतर आता भाजपा आमदार नितेश राणेसुद्धा त्यांच्या पत्नीच्या पाठीशी हिंदुत्ववादी म्हणून उभे राहत असल्याचं म्हटलं जात आहे. पुण्यात नितेश राणे शरद मोहोळच्या घरी जाणार याची चर्चा मात्र आज दिवसभर शहरात मोठ्या प्रमाणात सुरू होती.
हेही वाचा: