पुणे - मावळ तालुक्यात निसर्ग चक्री वादळामुळे पॉलीहाऊस आणि फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह अनेकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, राज्यातील या सरकारने केवळ पंचनामे केले, पुढे काय? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळायला वेळ लागेल, पण उपमुख्यमंत्री अजित पवार हे तर शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेत, त्यांचे काय, असे बोलत त्यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवारांना टोला लगावला.
हेही वाचा - दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपा आणि मित्र पक्षांचे राज्यव्यापी आंदोलन
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मावळ तालुक्यामध्ये निसर्ग वादळामुळे फुल शेतीचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे केले, पण पुढे काय झाले. पॉलीहाऊसचे मोठे नुकसान झाले. उद्धव ठाकरे यांचे ठीक आहे. त्यांना शेतीचे कळायला वेळ लागणार आहे. पण अजित पवार यांना कळत नाही का? ते तर शेतकरी आहेत. शेतकऱ्याच्या घरात जन्माला आले आहेत, असा टोला पाटील यांनी अजित पवारांना लगावला आहे.
तसेच, राज्यात शेतकऱ्यांना खत मिळत नाहीये, बियाणे मिळत नाही, सोयाबीनचे बियाणे बोगस आले. त्यातील 30 टक्केच उगवले आहे. एकही विमा कंपनी पुढे आली नाही. मराठवाड्यात पीक विमा काढला गेला. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस पडत नाही, ऑगस्ट आलाय, दुष्काळ पडला तर विमा कंपन्या भरपाई देणार नाहीत, कारण त्यांनी प्रीमियम घेतलाच नाही, असे पाटील यावेळी म्हणाले. कर्जमाफीपासून प्रश्नांची रांग लागलेली आहे. मात्र, आज आम्ही दुधाच्या विषयांकडे लक्ष केंद्रित केले आहे, असे पाटील यावेळी म्हणाले.