पुणे - भारतीय जनता पक्षाचे नेतेही शरद पवार यांना आपले नेते मानतात, असे विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राऊत हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे पत्रकार संघात त्यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजय राऊत यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल कोश्यारींनी राज यांना शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला. याबाबत राऊत म्हणाले, शरद पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा सल्ला घेण्यात गैर नाही. तसं नाही केलं तर आमच्या सारखे करंटे आम्हीच, असे सांगत, शरद पवार सरकार चालवत असल्याच्या टीकेला राऊत यांनी उत्तर दिले.
तसेच महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली. राज्यपाल यांनी राजभवनाबाहेर येऊन राजकारण करावं, राजभवन हे राजकारण करण्यासाठी नाही, असे ते म्हणाले. राज्यपालांनी पवारांकडे जायला सांगितलं असेल तर, चांगलं आहे. त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे पाठवलं नाही. याचा अर्थ ते आणि भाजपाचे नेतेही पवारांना आपले नेते मानतात. त्यांना मार्गदर्शन हवे असेल तर, मी पवारांशी बोलेन, अशी बोचरी टीका त्यांनी राज्यपालांवर केली.
राज-उद्धव यांच्याबद्दल...
राज आणि उद्धव एकत्र येण्याबाबत बोलताना, राजकारणात विचार महत्वाचा दोन वेगळे विचार आहेत. एकत्र येतील असे वाटत नाही, असे राऊत म्हणाले.