शिरूर (पुणे)- कोविड -१९ बाबत ताबडतोब आराखडा जाहीर करावा अन्यथा रस्त्यावर उतरणार, असा इशारा भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडीने लोकप्रतिनिधीना दिला आहे. कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता राज्य सरकार पुढे मोठे आवाहन उभे राहिले आहे. अशातच महाराष्ट्रात पुणे जिल्हा व पुणे जिल्ह्यात शिरुर तालुका हा हॉटस्पॉट ठरत असून लोकप्रतिनिधीचे कष्ट दिसून येत आहे. मात्र क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी शिरुरच्या लोकप्रतिनिधींवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे.
प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या कामावर प्रश्नचिन्ह
शिरूर तालुक्यात कोवीड -१९ चा प्रकोप वाढतच चालला असताना अनेक लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. पण प्रशासन एका कुटुंबाची चमकोगिरीत मग्न आहे,तर सत्ताधाऱ्यांकडुन नीच राजकारण केले जाते. प्रशासनाने कोविड - १९ बाबत ताबडतोब आराखडा जाहीर करावा अन्यथा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर शिरुर तालुक्यातील शिरुर - हवेली आमदारांचा दीड कोटीचा ड निधी, डि.पी.सी.चा ३०% निधी, आपत्ती व्यवस्थापनाचा तहसीलदार यांच्याकडे आलेला कोविड -१९ निधी गेला कुठे असा सवाल पाचंगे यांनी मांडला आहे.
कोविड १९ चा निधी कुठे गेला
तसेच जो निधी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे आलेला आहे, त्या संपुर्ण निधीतून एकही ऑक्सिजन सुविधेसह व व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध असणारे बेड तयार केले नाहीत. शिरूर -आंबेगावमधील शिरुर तालुक्यातील ३७ गावातही कोविड १९ चा निधी कुठे गेला, असा सवाल पाचंगे यांनी उपस्थित केला आहे.
तालुक्यात भाजपाने ५०० बेडचे तात्पुरते रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटरला प्रशासनाकडून परवानगी मागितली असता, ती देण्यात आली नाही, मात्र छोटेसे गाव असलेले बुरुंजवाडी येथे मात्र कोविड केअर सेंटरला परवानगी दिली जाते, असा दुजाभाव का केला जात आहे. शिरुर तालुक्यात ७ जिल्हा परिषद सदस्य व १४ पंचायत समिती सदस्य असताना त्यांना कोणत्याच बाबतीत विश्वासात घेतले जात नसल्याची वस्तूस्थिती समोर आली असून केवळ आमदार आणि त्यांचे कुटुंबीय सांगतील एवढेच प्रशासन ऐकत आहेत,अशी संजय पाचंगे यांनी टीका केली.
महसूल मधील गैरव्यवहार
लोकप्रतिनिधी किंवा शासनाच्या माध्यमातून १०० ते १५० बेडचे ऑक्सीजन व व्हेंटीलेटर बेड तयार करण्याचा सल्ला देण्यात आला असून अधिकारी इतके दबावाखाली का आहेत? का संगनमत आहे? की महसूल मधील गैरव्यवहार उघडकीस येऊ नये म्हणून घेतलेली खबरदारी तर नाही ना? असा सवाल पाचंगे यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला केला आहे.
प्रशासनास जाहीरपणे हात जोडून विनंती करतो कि कोविड - १९ अंतर्गत ताबडतोब ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेडची सुविधा निर्माण करा आणि लोकांचे प्राण वाचवा प्राण वाचवा, लोकांचे जीव जात राहिले तर मात्र गप्प बसणे अशक्य आहे, आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संजय पाचंगे यांनी दिला आहे.