पुणे - महाराष्ट्रात पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई, पुण्यासह दहा प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीतील वॉर्ड रचनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी टीका केली आहे. अजितदादांनी एकचा, दोनचा वॉर्ड करावा किंवा त्यांनी तिघांनी एकत्र लढावे, तरीही महाराष्ट्रातील या दहा महापालिकांमध्ये भाजपाच सत्तेत येणार, असा ठाम विश्वास भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात भाजपाला काडीमात्र रस नाही, असा टोलाही यावेळी संजय काकडे यांनी लगावला आहे.
'भाजपाला सरकार पाडण्यात काडीमात्र रस नाही'
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय वॉर्ड आणि इतर महापालिकांसाठी दोन सदस्यीय वॉर्ड रचना करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच, पुण्यात पत्रकारांशी बोलताना दररोज रात्री आपण झोपेतून उठून सरकार आहे की पडलं हे बघत असल्याचे खोचक विधान केले होते. त्यावर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी अजितदादांनी रात्रीची शांत झोप घ्यावी असे दचकून जागे होऊ नये. कारण, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात भाजपाला बिलकूल स्वारस्य नाही, असा टोलाही यावेळी काकडे यांनी लगावला आहे.
'अशा काळात राजकारण करणे योग्य नाही'
सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश कोरोनामुक्त करण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची कोरोना हीच प्राथमिकता असल्याचे सांगितले आहे. अशा काळात राजकारण करणे योग्य नाही. असे आमचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्कार आहेत. त्यामुळे अजितदादा आपण सरकार पडण्यासंबंधी बिलकूल काळजी करू नका. शांतपणे झोपा आणि दिवसभर काम करा. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवा, असे संजय काकडे म्हणाले.
'दहा महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाचाच विजय होणार'
अजितदादांना निवडणुकीचे डोहाळे लागलेत. वॉर्ड रचनेबद्दल त्यांची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांना एकच सांगायचे आहे की, तुम्ही एक, दोन सदस्यीय वॉर्ड रचना करा, तुम्ही तिघे एकत्र लढा, परंतु जनतेच्या मनात मात्र फक्त मोदी आहेत. ज्यापद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्पित भावनेने जनतेची सेवा करीत आहेत. त्याच भावनेने भाजपाचे सर्व नेते व कार्यकर्ते काम करीत आहेत. त्यामुळे भाजपाचे काम, कार्य यावर महाराष्ट्रातील दहा महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाचाच विजय होणार आहे, असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-'हा उपद्व्याप फकिरीत बसत नाही'; सेंट्रल विस्टावरून मोदींवर निशाणा