पुणे - विरोधात असले की, जो तो धनगर आरक्षण देऊ म्हणतो आणि सत्तेत आले की मात्र आरक्षण रखडते, असे म्हणत भाजपा नेते राम शिंदे यांनी एकप्रकारे भाजपालाच घरचाच आहेर दिला आहे. ते येथे बोलत होते.
शिंदे पुढे म्हणाले, मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत सर्वच पक्षांनी सोयीचे राजकारण केले आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटण्यासाठी राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. यासाठी आपण सर्व नेत्यांची भेट घेत आहोत. मराठा आणि धनगर आरक्षणाच्या बाबतीत राज्य म्हणते केंद्राचा प्रश्न आहे. केंद्र म्हणतेय राज्याचा प्रश्न आहे. मात्र, आरक्षणासाठी या दोघांच्याही सहकार्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशाला स्वातंत्र्य हवे होते, तेव्हा सर्वजण एकत्र आले; तसेच आरक्षण सगळ्यांना हवे आहे. यासाठीही सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आज (शनिवारी) खासदार उदयनराजे यांच्यासोबत राम शिंदे यांची आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेबाबत भेट होणार होती. मात्र, काही कारणास्तव ही भेट होऊ शकली नाही. तर लवकरच उदयनराजे यांच्यसोबत भेट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.