पुणे : जिल्ह्याचे राजकारण नेहमी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या दोन नेत्यांभोवती फिरते. कधी अजित पवार पालकमंत्री असतात तर कधी चंद्रकांत पाटील पालकमंत्री असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या बैठकीलाही हे दोघे येणार का याची उत्सुकता नेहमीच असते. आजही जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर कालवा समितीची पुण्यातील शासकीय विश्रामगृहावर महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. विरोधी पक्षनेते आणि जिल्ह्यातील एक आमदार म्हणून अजित पवार या बैठकीला उपस्थित राहतील असे चंद्रकांत पाटील यांना वाटले. मात्र अजित पवारांनी या बैठकीला दांडी मारली. बैठकीला पोहचलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गाडीतून उतरताच, 'अजित दादा कुठे आहेत?', असे विचारले. त्यांच्या या मिश्किल टिप्पणची सध्या पुण्यात चर्चा सुरु आहे.
राज्यात राजकीय चर्चांना उधाण : महाराष्ट्रात सध्या अजित पवार यांच्या मुख्यमंत्री बनण्यावरून वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. विविध कार्यकर्त्यांकडून तशी बॅनर लावण्यात येत आहेत. अजित पवारांनी मी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच असणार असे स्पष्टीकरण जरी दिले असले तरी, नेत्यांकडून मात्र अजित पवारांबद्दल संभ्रम तयार केला जात आहे. त्यासाठीच चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलं का, अशी सुद्धा आता चर्चा होते आहे.
अजित पवारांना पक्ष प्रवेशाचे जाहीर आमंत्रण : राज्यात भाजप व शिवसेना शिंदे गटाचे सरकार असले तरी शिंदे गटांच्या नेत्यांकडून देखील अजित पवारांनी पूर्णविराम दिला नाही तर तो स्वल्पविराम आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. तर दीपक केसरकर यांनी सुद्धा अजित पवारांचे आमच्या पक्षात स्वागत आहे, असे वक्तव्य केले आहे. पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी सुद्धा अजित पवारांना पक्षात प्रवेशाचे जाहीर आमंत्रण दिले आहे. त्यामुळे अजित पवारांचा भाजप प्रवेश हा चर्चेचा विषय बनला आहे.
कालवा समितीच्या बैठकीत पाणी नियोजनावर चर्चा : कालवा समितीच्या बैठकीत पाणी नियोजनावर चर्चा झाली. या बैठकीत पुण्याच्या पाणी प्रश्नावर चर्चा झाली. ही चर्चा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आजच्या बैठकीत पुण्यातील पाणी कपात पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुण्यात 15 मे पर्यंत पाणी कपात केली जाणार नसून 15 मे नंतर पाणीकपातीचा आढावा घेतला जाणार आहे.