पुणे - भाजपाकडून आज देशभरात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आजचा सुशासन दिन हा शेतकऱ्यांसोबत साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्हा व मंडल कार्यालयातर्फे पक्षाचे नेते, कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या सोबत 'किसान विकास सन्मान' मेळाव्याचे आयोजन करून हा दिवस साजरा करत आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातल्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांसोबत सुशासन दिवस साजरा करत आहेत, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे पुण्याजवळील मांजरी येथे शेतकरी मेळावा घेत आहेत. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुगाव येथे शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावली आहे.
दोघांच्या हातात बैलगाडीचा कासरा-
भाजपाचे प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भुगाव येथील शेतकरी मेळाव्या दरम्यान भव्य रॅलीचे आय़ोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बैलगाडीवर स्वार होत, स्वत:बैलाचे कासरे हाती घेतल्याचे दृश्य पाहायला मिळाले. तर दुसरीकडे मांजरी येथील शेतकऱ्यांच्या रॅलीत सहभागी झालेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बैलगाडीचे सारथ्य केल्याचे पाहायाला मिळाले.