पुणे - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली. या प्रकरणाशी वनमंत्री संजय राठोड यांचे कथितरित्या संबंध असल्याचे आरोप झाले त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुण्यातील नगरसेवक धनराज घोगरे यांच्यावर पूजा चव्हाण तिचा लॅपटॉप चोरल्याचा आरोप होत आहे. 'मी कुठेही गायब झालेलो नाही. माझ्यावर खोटा आरोप करणाऱ्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. माझ्याकडे लॅपटॉप असण्याचा संबंध नाही. माणुसकीच्या दृष्टीने मी मदत केली आहे. मदत करणे हा गुन्हा आहे का?', अशी प्रतिक्रिया धनराज घोगरे यांनी दिली.
बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुखांनी केले आरोप -
बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांनी धनराज घोगरे यांच्यावर आरोप केला आहे. घोगरे यांनी पूजा चव्हाणचा लॅपटॉप चोरला असून स्वतःच्या स्वार्थासाठी त्यातील फोटो ते मीडियाला देत असल्याचा हा आरोप आहे. त्यामुळे धनराज घोगरे आणि पूचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी करणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत संगीता चव्हाण यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्यापासून तिचा लॅपटॉप गायब आहे. तिचा लॅपटॉप नेमका गेला कुठे? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. तर पूजाच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर नसलेले वेगवेगळे फोटो मीडियाला मिळत आहेत. हे फोटो पूजाच्या लॅपटॉपमधील असल्याचा दावा होत आहे.
सर्व प्रकरण संशयास्पद -
दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वारंवार आरोप झाल्यामुळे संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद आहे. सात फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेनंतर पुणे पोलिसांकडे मीडियाला सांगण्यासाठी काहीही उपलब्ध नाही, असे दिसून आले आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पूजा चव्हाण प्रकरणाविषयी विचारले असता त्यांनी चालू पत्रकार परिषदेतून निघून जाणे पसंत केले.