पुणे - प्रेयसीला फिरवण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या 3 चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्या कडून पोलिसांनी 6 लाख रुपये किमतीच्या तब्बल 14 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. हिमांशू योगेश सोळंकी (20), निखिल संतोष जाधव (19), आशिष रोहिदास जाधव (21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार हे तिन्ही आरोपी मित्र असून प्रेयसीला फिरवण्यासाठी दुचाकी नसल्याने ते दुचाकी चोरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांमध्ये हिमांशू आणि आशिष हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत तर, निखिल हा सराईत गुन्हेगार आहे.
गुन्हे शाखा 5 च्या पोलीस कर्मचाऱ्यांना संबंधित आरोपी हे सोमाटने फाटा येथे दुचाकी घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथकं तयार करून सापळा रचण्यात आला. त्यानंतर मोठ्या शिताफीने संबंधित तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी केवळ प्रेयसीला फिरवण्यासाठी म्हणून दुचाकी चोरत असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून 6 लाख किमतीच्या 14 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील 12 गुन्हे देखील उघडकीस आले आहेत.