पिंपरी-चिंचवड - पर्यटकांच्या परिचयाचं ठिकाण असलेले भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात पर्यटन बंदी असल्याने लोणावळ्यात भुशी धरणावर आनंदाला पर्यटकांना मुकावे लागणार आहे. असे असताना काही पर्यटक नियम धुडकावून भुशी धरणावर पोहोचले. भुशी धरणाच्या पायऱ्यावरून पाणी ओसांडून वाहत आहे. त्याचा पर्यटक आनंद लुटत आहेत.
लोणावळा हे पर्यटनस्थळ असून पावसाळ्यात डोंगर दऱ्यांमधून धबधबे वाहत असतात. त्यात, भुशी धरण ओव्हर फ्लो झाले असे म्हटले की हजारो पर्यटक लोणावळ्याच्या दिशेने येतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पुणे जिल्ह्यात पर्यटनबंदी आहे. त्यामुळं काही पर्यटक हे बंदी धुडकावून भुशी धरणावर पोहोचत आहेत. दरम्यान, यावर्षी धरण काही दिवस अगोदर ओव्हर फ्लो झाल्याचे पाहायला मिळालं आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपा आमने सामने, कुडाळमध्ये पोलीस छावणीचे स्वरूप
भुशी धरण ओव्हर फ्लो झाले असून पर्यटक आकर्षित होत आहेत. हे पाहूनच लोणावळा पोलिसांनी गर्दी होऊ नये आणि पर्यटनबंदी असल्याने भुशी धरणावरील पर्यटकांना हुसकावून लावले आहे. यामुळे स्थानिक व्यापारी नाराज आहे. तसेच याचा थेट फटका त्यांच्या व्यवसायाला बसत आहे. पुणे जिल्ह्यातच पर्यटन बंदी का? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.