पुणे - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे भीमाशंकर मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने मंदिर १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीच्या वतीने घेणात आला आहे. भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कोदरे यांनी संबंधित माहिती दिली आहे.
देशात कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे लॉकडाऊन कडक करण्यात आले आहे. घराबाहेर पडून गर्दी करू नका, असे आवाहन नागरिकांना प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी टाळण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समितीच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. तसेच पुढील काळात केंद्र व राज्य सरकारचा कोरोनाबाबत येणाऱ्या आदेशांचे पालन करण्यात येईल, असे ते म्हणाले.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरला भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. मात्र शिवलिंगावर नित्यनेमाने दिवसातून तीन वेळा म्हणजे पहाटे आरती, दुपारी आरती व नैवेद्य, संध्याकाळी आरती व रात्रीची आरती असा दिनक्रम सुरू आहे. मात्र यावेळी गर्दी न करता सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यात येत असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.