पुणे : Bhimashankar Temple Clashes : पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या भीमाशंकर मंदिर परिसरात (Bhimashankar Temple) पुजाऱ्यांमध्येच हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरातील पूजेच्या अधिकारावरून दोन गट भिडले. तर हाणामारी केल्याप्रकरणी दोन्ही गटांमधील ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर देखील पुजाऱ्यांमधील वाद आणि हाणामारी सुरूच होती. पोलिसांसमोर हा हाणामारीचा प्रकार सुरू असल्यानं अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. या हाणामारीत काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत.
पुजाऱ्यांच्या दोन गटात वाद : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर मंदिरात मोठ्या प्रमाणावर नागरिक दर्शनासाठी येत असतात. भीमाशंकर मंदिरात पुजा करण्यावरून पुजाऱ्यांच्या दोन गटात वाद आहे. मंदिरात सोमवारी नेहमीप्रमाणे भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते. त्यावेळी दुसऱ्या गटाचा जमाव मंदिराच्या गाभाऱ्यात घुसला. यावेळी पाटावर पुजेसाठी बसलेले पुजारी कौदरे यांच्याशी विजय भिमाजी यांनी वाद घालत दमदाटी करून त्यांना पाटावरून उठवले. त्यानंतर दमदाटी आणि शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, अशी तक्रार गोरक्ष यशवंत कौदरे यांनी दिली. त्यावरुन एका गटाच्या पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच शंकर कौदरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुसऱ्या गटाच्या २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : दोन गटात होणाऱ्या या वादासंदर्भात सर्वसामान्य भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सदर वाद हा मंदिरातील पुजेच्या कारणावरुन झाला आहे. तर पुजाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांनी सांगितलं की, पुजेच्या कामात अडथळा निर्माण करण्याचं काम काहीजण करत आहेत. हे सर्व लोक आमचेच आहेत. या प्रकरणावर लवकरच तोडगा काढण्यात येईल.
हेही वाचा -