पुणे - व्हॉट्सअॅप आणि फेसबुक म्हणजे उकीरडा आहे. त्यामुळे या समाजमाध्यमांचा उपयोग करू नका, असा आदेश शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे गुरुजी यांनी धारकांना दिला आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर आपले मत प्रकट करुन आपण फार मोठे चिंतनशील आहोत, काळजी करणारे आहोत, असे दाखवू नका, असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
दरवर्षीप्रमाणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी निमित्त वारकरी धारकरी संगमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हजारो धारकरी जंगली महाराज मंदिरात एकत्र जमले होते. त्यांना संबोधित करताना भिडे गुरुजींनी हा आदेश दिला आहे.
त्याप्रमाणेच भिडे गुरुजी आणि त्यांचे धारकरी पुण्यातील संचेती रुग्णालयापासून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर मार्गक्रमण करणार आहेत. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात कुणीही घुसू नये, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.